करोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्य़ातील महापालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहिमेचा वेग वाढविला असला तरी ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर तसेच आसपासच्या शहरांमध्ये कोव्हिशिल्ड लशीच्या तुम्टवडय़ामुळे सलग तिसऱ्या दिवशी स्थानिक प्रशासनाला लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागली आहेत. या सर्वच ठिकाणी सुरुवातीच्या काळापासूनच मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झालेल्या कोव्हिशिल्ड लशीची पहिली मात्रा अनेकांनी घेतली असून त्यांचा ८४ दिवसांचा कालावधी पूर्ण होऊन गेल्यानंतरही त्यांना लस मिळत नसल्याने अनेक जण हवालदिल झाले आहेत.
ठाणे जिल्ह्य़ात गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यात आला आहे. जिल्ह्य़ात आतापर्यंत २३ लाख ३ हजार ५१९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी २१ लाख ९ हजार ६९७ नागरिकांना कोव्हिशिल्ड लस, तर १ लाख ९३ हजार ८२२ नागरिकांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली आहे. सुरुवातीपासून जिल्ह्य़ात कोव्हिशिल्ड लशीचा साठा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाला असून यामुळेच ही लस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मोठे असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्य़ातील विविध शहरांमध्ये कोव्हिशिल्ड लशीचा मोठय़ा प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून यामुळे शहरातील लसीकरण मोहिमेत व्यत्यय येत आहे.
ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि बदलापूर पालिकांकडे कोव्हिशिल्ड लशीचा साठा उपलब्ध नाही. यामुळे या तिन्ही पालिकांनी सलग तीन दिवस लसीकरण केंद्रे बंद ठेवली आहेत. ठाणे महापालिकेच्या ४० केंद्रांवर मंगळवारी केवळ कोव्हॅक्सिन लस देण्यात येत होती. या लशीचाही साठा संपल्यामुळे आता पालिकेने सर्वच केंद्रे पुन्हा बंद ठेवली आहेत. केंद्र शासनाने कोव्हिशिल्ड लशीच्या दोन मात्रेतील अंतर वाढवून ८४ दिवसांचे केले. त्याआधी पहिली मात्रा घेऊन ४६ दिवसांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या नागरिकांना दुसरी मात्रा दिली जात होती. केंद्राच्या नव्या नियमामुळे नागरिकांना दुसऱ्या मात्रेसाठी ८४ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक नागरिकांचा हा कालावधी पूर्ण होऊन गेला आहे. तरीही त्यांना कोव्हिशिल्ड लशीची दुसरी मात्रा मिळत नसल्याचे चित्र आहे. दुसरी मात्रा मिळविण्यासाठी नागरिक वणवण फिरत असून याबाबत पालिका प्रशासनाकडेही विचारणा करीत आहेत. लससाठा उपलब्ध नसल्याचे पालिका प्रशासनाकडून उत्तर मिळत असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.
