अहमदाबाद शहरातील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका गुन्हेगाराला रस्त्याच्या बाजूला असलेल्या ढाब्यातून अटक केली आहे. या फिल्मी स्टाईल अटकेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. अटक करण्यात आलेला आरोपी दरोडा आणि बलात्कारासह १४ गुन्हांमध्ये सामील होता. गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील सरस्वती तालुक्यातील अमरपुरा गावात एका ढाब्यावर तो पकडला गेला. आरोपीकडे पिस्तूल देखील होते. ढाब्यावरील सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली होती.
अहमदाबाद पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बनसकांठा रहिवासी असलेल्या आरोपी किशोर उर्फ केके, याला पकडण्यासाठी साध्या वेशात गुन्हे शाखेच्या तपास यंत्रणेचे (सीसीबी) अधिकारी गेले होते आहेत. पोलिसांनी एकमेकांना इशारा करताच त्यांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांच्या या फिल्मी स्टाईल कारवाईचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. कारवाईत आरोपी किशोर आणि अन्य तिघांना अटक करण्यात आली. व्हिडिओमध्ये, पाच ते सात पोलीस कर्मचारी ढाब्यात बसण्यासाठी काही जागा शोधण्याचा प्रयत्न करीत होते. मग ते अचानक किशोरच्या दिशेने गेले आणि त्याला ताब्यात घेतले.
“गुन्हे शाखेचे अँटी ऑर्गनाइज्ड क्राइम युनिट चांदखेडा आणि साबरमती पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या वाहन चोरीच्या दोन घटनांचा तपास करत होते आणि चोरीमध्ये केकेचा सहभाग असल्याचे आम्हाला कळले. तांत्रिक गोष्टींचा वापर करून आम्हाला आरोपीचा पत्ता सापडला, ” असे अहमदाबाद गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
२७ जून रोजी संध्याकाळी पाटण शहरातील अमरपुरा गावात एकता ढाब्यामध्ये ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद, बनासकांठा आणि राजस्थानमधील दहा पोलीस ठाण्यांशी संबंधित सशस्त्र लूट, वाहन चोरी, घरफोडी, बलात्कार, खंडणीच्या गुन्ह्यांत किशोरला अटक करण्यात आली आहे.
