गरवारे शाळेच्या आवारात मध्यरात्री दारू पित बसलेल्या दोन मित्रांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्याच्या डोक्यात बाटली मारून खून केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी समोर आला. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
राजन रमेश सहानी (वय २७, रा. वारजे नाका) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी किसन प्रकाश वरपा (वय २१, रा. श्रमिक वसाहत, कर्वे रोड) याला अटक केली आहे. आरोपी व राजन हे दोघे मित्र आहेत. राजन हा पेटिंगचे काम करतो. राजन आणि किसन दोघांनाही दारू पिण्याचे व्यसन आहे. किसन काहीही कामधंदा करीत नाही. मंगळवारी रात्री दोघेजण डेक्कन पोलीस ठाण्याजवळील गरवारे शाळेच्या मैदानावर दारू पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी आरोपीने राजनच्या डोक्यात मारल्याने त्याचा मृत्यू झाला. आरोपीने स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन कृत्याची कबुली दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी डेक्कन पोलीस अधिक तपास करत आहेत.
