राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिन्यांची दुरूस्ती तसेच स्टेम प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्राणांची दुरूस्ती यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा शहरातील काही भागांत गुरुवार ते शनिवापर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे. तसेच दुरुस्तीनंतर पुढील दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होणार आहे.
एमआयडीसीने जांभूळ जलशुद्धीकरण येथील जलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली आहे. या कामांमुळे कळवा, खारेगाव, पारसिक नगर, आतकोनेश्वरनगर, विटावा, घोलाईनगर, रेतीबंदर, मुंब्रा, दिवा, शीळ, कौसा, डायघर, देसाई, वागळे इस्टेट येथील इंदिरानगर, रुपादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड तसेच बाळकुम पाडा नं .१ या ठिकाणी होणारा पाणीपुरवठा गुरुवारी २४ तास बंद राहणार आहे.
स्टेम प्राधिकरणाकडूनही शुक्रवार आणि शनिवारी स्टेम प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा करणारी यंत्रणा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत शहरातील घोडबंदर, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, विजयनगरी, गायमुख, गांधीनगर, सुरकरपाडा, बाळकुम, माजिवाडा, चितळसर, मानपाडा, कोठारी कंपाउंड, पवारनगर, आझादनगर या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी रात्री ९ ते शनिवार सकाळी ९ वाजेपर्यंत कळवा, साकेत, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, जेल टाकी, जॉन्सन, इटर्निटी, समता नगर तसेच मुंब्रा शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुरूस्तीनंतरही पुढील काही दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केली आहे.
