करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आयएमए व जिल्ह्य़ातील खासगी बालरोगतज्ज्ञांसोबत एक आढावा बैठक घेतली. या वेळी लहान मुलांवरील उपचारासाठी आवश्यक औषधांची यादी प्रशासनाला सादर करावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली.
जिल्ह्य़ातील सर्व खासगी बालरुग्णालयांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या तसेच आनुषंगिक साहित्याची संख्या दुप्पट करून तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्जता ठेवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले. खासगी रुग्णालयांकडे असलेल्या एकूण ५९० खाटांची संख्या ही रुग्णालयांनी किमान दुप्पट करावी. तसेच व्हेंटिलेटर व सर्व खाटा ऑक्सिजनेट करावेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमार्फतही लहान मुलांसाठी दोन कोविड केअर सेंटरची व्यवस्था करण्यात येत आहे.
तिसऱ्या लाटेपूर्वी दक्ष राहावे
तिसऱ्या लाटेच्या पाश्र्वभूमीवर नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केले. ते उदगीर येथील श्री नवयुवक व्यापारी मंडळ, संघर्ष मित्रमंडळ, रोटरी क्लब ऑफ उदगीर या सामाजिक संस्थांच्या वतीने गृहविलगीकरणात असलेल्या करोनाबाधित रुग्णांसाठीच्या ऑक्सिजन यंत्राच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, राष्ट्रवादीचे नेते बसवराज पाटील नागराळकर, राजेश्वर निटुरे आदी उपस्थित होते.
