चाकात ओढणी अडकल्याने मृत्यू

चाकात ओढणी अडकल्याने मृत्यू

पालघर जिल्ह्यातील अलेवाडी येथे दुचाकीवर मागे बसल्यानंतर मागील चाकात ओढणी अडकल्याने खाली पडून महिलेचा मृत्यू झाला.

शनिवारी सकाळी ही घटना घडली. प्रणाली धनू (२५) असे या महिलेचे नाव आहे. अपघात होताना प्रणाली यांनी प्रसंगावधान राखल्याने त्यांच्या एक वर्षाच्या मुलीला वाचवण्यात त्यांना यश आले.

बोईसरजवळील आलेवाडी येथे राहणारे आकाश धनू हे आपली पत्नी प्रणाली व एक वर्षाची मुलगी यांना घेऊन मोटारसायकलने नवापूरमाग्रे दांडी येथे जात होते. त्यांचा राखी विक्रीचा व्यवसाय आहे.

राख्यांची विक्री करण्याचे नियोजन करण्यासाठी हे दांपत्य जात होते. नवापूरजवळ अचानक प्रणाली यांची ओढणी मोटारसायकलच्या मागील चाकात अडकली व त्यांना फास बसून त्या खाली पडल्या व मोटारसायकलसोबत फरफटत गेल्या.

फास बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी प्रणाली यांनी त्यांच्या मुलाला मात्र हातातून सोडले नाही. त्यामुळे लहानगीचा जीव वाचला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *