रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात पिरंदवणे येथे जंगलात बिबट्या ( leopard ) मृतावस्थेत सापडला. दरम्यान, दोन बिबट्यांमध्ये झटापट झाल्याची शक्यता जखमी झालेल्या बिबट्यावरुन दिसून येत आहे. नर मादीचा बिबट्या जीव वाचवण्यासाठी झाडावर चढला असण्याची शक्यता असून झाडावरुन कोसळून त्याच्या पायाला इजा झाल्याने त्याला कोणतीच हालचाल करता येत नव्हती. तसेच यात उपाशीपोटी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
पिरंदवणे येथील गुराखी गुरे घेऊन चरण्यासाठी जंगलात गेला असता त्याला तवरशेत या ठिकाणी वाघ दिसला सुरुवातीला हा निद्रा घेत असल्याचे त्याला वाटले. परंतु बराचकाळ त्या बिबट्याची कोणतीच हालचाल नसल्याने आणि त्या ठिकाणाहून दुर्गंधी येऊ लागल्याने बिबट्या मृतावस्थेत आहे याची खात्री त्या गुराख्याला झाली. त्याने याची माहिती पोलीसपाटील अनिल भामटे यांना दिली. पोलीसपाटील यांनी बिबट्या मृतावस्थेत असल्याची खात्री करुन त्याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका लगड,वनपाल सुरेश उपरे,वनरक्षक न्हानू गावडे,डिंगणी पोलीस दुरक्षेत्राचे चंद्रकांत कांबळे, लांडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा केला. पिरंदवणे येथील तारवशेत येथे बिबट्या हा कुजलेल्या स्थितीत आढळून आला. हा बिबट्या अडीच वर्षाचा असून नर जातीचा होता. त्याची लांबी २०५सेमी.आणि ६७ सेमी उंची होती. बिबट्या दोन दिवसांपूर्वी मृत झाला असावा अशी शक्यता वनविभागाच्यावतीने वर्तवली आहे. देवरुख येथील वशुधन अधिकारी यांनी शवविच्छेदन करुन त्याच ठिकाणी जवळच मृत बिबट्याला अग्नी देण्यात आला. यावेळी पोलीसपाटील व ग्रामस्थ हजर होते.