बेंगळुरू-नांदेड एक्सप्रेसच्या डब्ब्याला ट्रकने दिली जोरदार धडक

बेंगळुरू-नांदेड एक्सप्रेसच्या डब्ब्याला ट्रकने दिली जोरदार धडक

आंध्रप्रदेशमध्ये सोमवारी पहाटे बेंगळुरू-नांदेड एक्सप्रेसच्या डब्ब्याला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सहाजण ठार झाले यात कर्नाटकच्या एका आमदाराचा समावेश आहे.

कर्नाटकचे आमदार वेंकटेश नायक या अपघातात ठार झाले. अनंतपूर जिल्ह्यात लेव्हल क्रॉसिंगजवळ हा अपघात झाला. ग्रेनाईट वाहून नेणा-या ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने बेंगळुरु-नांदेड एक्सप्रेसच्या डब्ब्याला धडक दिली.

स्वत: ट्रक चालकही ठार झाला. ही धडक इतकी जबरदस्त होती कि, एक्सप्रेस गाडीचे दोन डब्बे रुळावरुन घसरले. या अपघातामुळे बेंगळुरू-गुंटाकल मार्गावरील रेल्वे वाहतूक काहीवेळासाठी विस्कळीत झाली होती.

किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना पेनूकोडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्यावेळी लेव्हल क्रॉसिंगचा गेट बंद होता. ट्रकने आधी गेटला धडक दिली नंतर डब्ब्यावर जाऊन आदळला. प्रवासी गाढ झोपेत असताना हा अपघात घडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *