मुंबई महापालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढवला जात असल्याचा दावा सत्ताधारी शिवसेना-भाजपा आणि प्रशासनातील अधिका-यांकडून केला जात असला तरी हा दर्जा वाढवण्यासाठी आवश्यक असलेली शिक्षकांची अनेक पदेच रिक्त असल्याचे उघडकीस आले आहे.
आठ माध्यमे, आव्हानात्मक शाळा आणि मुंबई पब्लिक स्कूल अशा महापालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये तब्बल १ हजार ५७० पदे रिक्त असून यामध्ये मुख्याध्यापकांची १०३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षकांचीच पदे रिक्त असतील तर शिक्षणाचा दर्जा कसा वाढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई महापालिकेच्या वतीने मराठी, हिंदी, गुजराथी, उर्दू, तमिळ, तेलगू, कन्नड, इंग्रजी अशा आठ माध्यमांच्या शाळा चालवल्या जात असून आव्हानात्मक आणि मुंबई पब्लिक स्कूल अशाप्रकारे एकूण १ हजार १०७ शाळा चालवल्या जात आहेत. या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या सध्या ३ लाख ४३ हजार ८७३ आहे. मात्र, या सर्व शाळांसाठी ६६८ मुख्याध्यापक आणि ११ हजार २०० शिक्षकांची संख्या आवश्यक असताना प्रत्यक्षात ५६५ मुख्याध्यापक आणि ९ हजार ६३० शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे आजही मुख्याध्यापकांची १०३ पदे आणि शिक्षकांची १ हजार ५७० पदे रिक्त आहेत.
याशिवाय शिक्षण हक्क अधिकारांतर्गत अंशकालीन निर्देशक म्हणूनही १ हजार ०१४ पदे केवळ निर्माण करण्यात आली असून ती अद्यापही भरण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिका शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी २७ शालेय वस्तूंसह व्हच्र्युअल क्लासरूमची संकल्पना मांडली जात आहे. परंतु विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी येथे पुरेसे शिक्षकच नाहीत .
शिक्षकांच्या रिक्त पदांमध्ये हिंदी माध्यमांच्या शाळांमधील ५७५ पदे, उर्दू माध्यमांच्या शाळांमधील ४१८, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील २२२ पदे तर मुंबई पब्लिक स्कूलमधील १६४ पदे रिक्त आहेत. मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती वाढत असल्यामुळे पटसंख्या घटत आहे. त्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये ३३ पदे अतिरिक्त आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाने महापालिका शाळा, पटसंख्या, तुकडय़ा, शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची सांख्यिकी माहिती सादर केली असून या अहवालातून ही पदे रिक्त असल्याचे उघडकीस आले आहे.
