मुंबईत बुधवारी तब्बल एक हजार १६७ जणांना करोनाची बाधा झाली तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णवाढीचा दरही ०.२४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत वाढ होत होती. त्यामुळे नियम तोडणाऱ्यांविरुद्ध कारवाई तीव्र करण्यात आली आहे. गेले दोन दिवस रुग्णसंख्या उतरणीला लागली होती. मात्र, बुधवारी रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले. आतापर्यंत मुंबईत तीन लाख २१ हजार ६९८ जणांना करोना झाला आहे. तर तीन लाख एक हजार ५७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर स्थिर आहे.
रुग्णदुपटीचा कालावधी सरासरी २९४ दिवसांवर घसरला आहे. करोनाबाधित रुग्णांचा शोध घेण्यासाठी गेल्या २४ तासांमध्ये सुमारे २१ हजार १२३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ३१ लाख ८५ हजार ३३४ चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या २४ तासांमध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या जोखमीच्या गटातील सहा हजार ७३ संशयित रुग्णांचा शोध घेण्यात पालिकेला यश आले.
