गणेशभक्तांचा सुखमय प्रवास आणि अपघातमुक्त रस्ते हेच मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगत एसटीची प्रतिमा जनमानसात उंचवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिले. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी ठाण्यातून सुमारे ८५० एसटी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून, एसटींना टोलमाफी देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ठाण्यातून जादा गाड्या सोडण्याप्रमाणेच प्रवाशांच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालायात बैठक आयोजित केली होती. ठाणे जिल्ह्यात एकूण आठ डेपो असून ७६६ जादा गाड्यांपैकी ७४२ गाड्यांचे आरक्षण झाले आहे. १२ सप्टेंबर रोजी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पाठवण्यात आलेल्या तीन हजार गाड्या १४ तारखेला परततील. १५ तारखेपासून ठाण्यातून ८०० ते ८५० गाड्या कोकणात सोडण्यात येणार आहेत.

