पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी कोलकत्ता येथे ५ रूपयांमध्ये जेवण देणारी ”माँ कँटीन” ही योजना सुरू केली. सुरूवातीला कोलकत्त्यामध्ये १६ ठिकाणी ही योजना राबवली जाईल, जिथे कमीतकमी एक हजारापेक्षा जास्त लोकांना दुपारचे जेवण देण्यात येईल.
“जसं आपली आई, माँ किंवा अम्मा घरातील प्रत्येकाला प्रेमाने जेवण देते तसंच माँ योजनेमध्ये गरजूंना जेवण दिले जाईल. यामध्ये डाळ, भात, भाजी आणि अंड्याचा रस्सा हे पदार्थ दिले जातील”, असं मत बॅनर्जी यांनी व्यक्त केलं.
तामिळनाडुच्या तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांनी असेच अम्मा कँटीन सुरू केले होते, जिथे ५ रूपयांमध्ये गरीबांना पोटभर जेवण दिले जात होते. याच धर्तीवर बॅनर्जी यांची ही योजना असल्याचे समजते. परंतु विरोधकांच्या मते हा निवडणुकीसाठी करण्यात आलेला राजनैतिक स्टंट आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी १०० करोड रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. लोकांना फक्त ५ रूपये द्यावे लागतील आणि उरलेल्या १५ रूपयांचा अधिभार राज्यशासन सहन करेल. लवकरच सर्व शहरी स्थानिक संस्थांमध्ये दुपारी १ ते ३ च्या दरम्यान कँटीन सुरू होतील. हळूहळू अशा स्वरूपातील कँटीन कोलकत्त्याबाहेरही सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
