अभिनेता दीप सिद्धू याला अटक

26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाला राजधानी दिल्लीत आंदोलक शेतकर्‍यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान घडलेल्या लाल किल्ला हिंसाचार घटनेतील मुख्य आरोपी पंजाबी गायक-अभिनेता दीप सिद्धू याला अखेर अटक झालीय. दिल्ली पोलिसांच्या एका स्पेशल सेलनं दीप सिद्धू याला अटक केलीय. हिंसाचारानंतर दीप सिद्धू फरार होता. ट्रॅक्टर रॅली दरम्यान आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना नियोजित मार्गावरून दुसर्‍या मार्गावर नेण्याचा तसंच शेतकर्‍यांना चिथावण्याचा प्रयत्न केल्याचा सिद्धू याच्यावर आरोप आहे.

उल्लेखनीय म्हणजे, प्रजासत्ताक दिनाला झालेल्या हिंसाचार प्रकरणात आत्तापर्यंत 127 जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी, याच प्रकरणात दिल्ली पोलिसांनी हरप्रीत सिंह (32 वर्ष), हरजीत सिंह (48 वर्ष), धर्मेंद्र सिंह (55 वर्ष) या लोकांनाही अटक केलीय. सीसीटीव्ही आणि मोबाईल फुटेजद्वारे पोलीस हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेत आहेत.

फरार झाल्यानंतर सिद्धू सोशल मीडियाद्वारे आपले व्हिडिओ पोस्ट करत होता. आपल्या एका जवळच्या मित्राच्या मदतीनं तो हे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या व्हिडिओंद्वारे आपण निर्दोष असल्याचा दावा सिद्धू करत होता. दीप सिद्धूला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या अनेक टीम्स पंजाबमध्ये अनेक ठिकाणी शोध घेत होत्या.

लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनेनंतर जाब विचारणार्‍या शेतकर्‍यांच्या तावडीतून निसटून दीप सिद्धू फरार झाला होता. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शेतकरी संघटनांनी दीप सिद्धू हा भाजपशी संबंधित असल्याचा आरोप केला होता.

या अगोदर, दिल्ली पोलिसांकडून दीप सिद्धूसहीत इतर आरोपींवर एक लाखांचं बक्षीस घोषित करण्यात आलं होतं. दीप सिद्धू, जुगराज सिंह, गुरजोत सिंह आणि गुर्जंत सिंह यांची माहिती देणार्‍याला एक लाख रुपये तसंच जजबिर सिंह, बुटा सिंह, सुखदेव सिंह आणि इक्बाल सिंह या आरोपींची माहिती देणार्‍याला प्रत्येकी 50 हजार रुपयांचं बक्षीस देणार असल्याचं दिल्ली पोलिसांनी जाहीर केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *