हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा कारशेडचा प्रश्न मार्गी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात येणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाच्या माण येथील कारशेडच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संबंधित प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणाऱ्या परताव्याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. विभागीय आयुक्तांच्या मंजुरीनंतर कारशेड उभारणीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

‘या मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडची जागा २००४ मध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळासाठी (एमआयडीसी) आरक्षित करण्यात आली होती. हे आरक्षण बदलून संबंधित जागा मेट्रो प्रकल्पासाठी देण्याची कागदोपत्री प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे भूसंपादनातील अडचणी दूर झाल्या आहेत. या जागेबाबत प्रकल्पग्रस्तांना द्यावयाच्या परताव्याची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे,’ असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले. ‘या मेट्रो प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या जागांपैकी यशदा आणि वाडिया महाविद्याालयांच्या आवश्यक जागांचा ताबाही घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या जागांसाठी पाठपुरावा सुरू आहे,’ असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

‘पीएमआरडीए’कडून सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) या तत्त्वावर हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी टाटा-सिमेन्स यांच्यासोबत करार झाला असून, करारानुसार ‘पीएमआरडीए’ने या प्रकल्पासाठी आवश्यक जागा टाटा-सिमेन्सला ताब्यात देणे आवश्यक आहे. मात्र, माण येथील कारशेडच्या जागेबाबत विरोध असल्याने भूसंपादनाची प्रक्रिया रखडली होती. आता हा अडथळा दूर होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *