कोंबडी बाजाराला ‘बर्ड फ्लू’चा ताप!

बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या महिनाभरापासून कोंबडी बाजारात आलेली मरगळ आता आणखी वाढली आहे. ‘बर्ड फ्लू’च्या भीतीमुळे ग्राहकांनी कोंबडी खरेदीकडे पाठ फिरवली असून गेल्या दोन-तीन महिन्यांत चिकनच्या मागणीत तब्बल ९० टक्क्यांची घट झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मागणी घसरल्याने दरांतही घसरण झाली असून सध्या ब्रॉयलर कोंबडी १०० रुपये तर, गावठी कोंबडी २०० रुपये किलोने विकली जात आहे. अंड्याच्या दरातही दीड रुपयाने घसरण झाली आहे.

हिवाळ्याच्या कालावधीत चिकनला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु, सध्या थंडीचे दिवस असताना कोंबडी आणि अंडी    यांची मागणी घटत चालली आहे. ‘बर्ड फ्लू’चा फैलाव ठिकठिकाणी होऊ लागल्यामुळे नागरिकांनी भीतीने कोंबडीच्या मांसापासून बनवणाऱ्या पदार्थांकडे पाठ फिरवली आहे. बकऱ्याचे मटण, मासे यांच्या तुलनेत चिकन आणि अंड्याचे दर हे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असतात. त्यामुळे चिकन आणि अंड्याला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु, बर्ड फ्लूमुळे चिकन आणि अंड्यांच्या मागणीत ९० टक्के घट झाल्याचे चित्र आहे. रविवारच्या दिवशी कोंबडीच्या खरेदीसाठी दुकानात मोठी गर्दी असते. पण सध्या रविवारच्या दिवशी १० ते १५ कोंबड्यांचीसुद्धा विक्री होत नसल्याचे ठाण्यातील कोंबडी विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. कोंबडीच्या मागणीत घट झाल्याने त्यांच्या दरातही घसरण झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

बर्ड फ्लूचा फैलाव होण्यापूर्वी १४० रुपये किलोने ब्रॉयलर कोंबडी तर, २६० रुपये किलोने गावठी कोंबडी आणि ६ रुपये ५० पैशानी प्रति नग अंडे विकले जात होते. गेल्या काही दिवसांत त्यात घट होऊन ब्रॉयलर कोंबडी १०० रुपये किलोने तर, गावठी कोंबडी २०० रुपये किलोने आणि प्रति नग अंडे पाच रुपयांनी विकले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *