एका दिवसात एक लाख पासची विक्री

एका दिवसात एक लाख पासची विक्री

सर्वसामान्य नागरिकांना कमी गर्दीच्या वेळी लोकल प्रवासाची परवानगी दिल्यानंतर अनेकांनी पास काढून प्रवासाचा मार्ग मोकळा करून घेतला. सोमवारी एकाच दिवसात मध्य आणि पश्चिाम रेल्वेवर तब्बल एक लाख सहा हजार ३८३ पासची विक्री झाली. तर २६ हजार ९५० जणांच्या पासला मुदतवाढ देण्यात आली. तिकिटाबरोबरच पास काढण्यासाठी प्रवाशांची मंगळवारीही धडपड सुरूच होती. परिणामी, तिकीट खिडक्यांसमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल झाली असली तरीही लोकल प्रवासास परवानगी नसल्याने सर्वसामान्यांना पर्यायी वाहनाने कार्यालय गाठावे लागत होते. मात्र सर्वसामान्य नागरिकांना सोमवारपासून सकाळी ७ च्या आधी, दुपारी १२ ते दुपारी ४ आणि रात्री ९ नंतर लोकलने प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही पर्यायी वेळ अनेकांनी स्वीकारली असून तिकिटाबरोबरच पास काढण्यासाठीही अनेकांनी रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीबाहेर रांगा लावल्या होत्या. टाळेबंदीच्या काळात मुदत संपलेल्या पासची मुदतवाढ करून घेण्यासाठीही अनेक प्रवाशांनी धाव घेतली होती. सकाळी ७ नंतर येणाऱ्यांना मात्र पासची मुदवाढ करून दिली जात नव्हती. मंगळवारपासून लोकल प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांनी सोमवारी दुपारी १२ नंतरही स्थानकात जाऊन पास काढले. मर्यादित प्रवास वेळेनुसारच यूटीएस मोबाइल अ‍ॅपवरही पास व तिकीट काढण्याची मुभा होती. त्यातच तांत्रिक समस्या येत असल्याने अनेक जण तिकीट खिडक्यांवरच येऊन पास काढत होते. परिणामी कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, कु र्ला, घाटकोपर, मानखुर्द, अंधेरी, बोरिवली, नालासोपारा, दादर, कांदिवली, विरार, भाईंदर, वांद्रे, गोरेगाव स्थानकांत गर्दी होती.

पश्चिम रेल्वेवरून सोमवारी ४५ हजार ९६८ नवीन पासची खरेदी प्रवाशांनी केली. तर १४ हजार ९५० पासला मुदवाढ देण्यात आली. मध्य रेल्वेवरही ६० हजार ४१५ पास आणि १२ हजार पासला मुदवाढ देण्यात आल्याची माहिती दिली. याशिवाय ७९४ मोबाइल सेवेतूनही पास काढण्यात आले. हे पाहिल्यास तब्बल ८९ हजारांपेक्षा जास्त पासची विक्री झाली. तिकीट खिडक्यांवरून तिकीट व पास, मोबाइल तिकीट व पास, एटीव्हीएम तिकीट यातून मध्य रेल्वेला दोन कोटींहून अधिक महसूल प्राप्त झाला. तर पश्चिम रेल्वेलाही सुमारे दोन कोटी रुपयांचा महसूल मिळाला. नवीन पास काढणाऱ्यांमध्ये अत्यावश्यक सेवा कर्मचारीही आहेत. परंतु त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *