सीए परीक्षेत मुंबईची कोमल जैन देशात पहिली

सीए परीक्षेत मुंबईची कोमल जैन देशात पहिली

सनदी लेखापाल (सीए) परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला असून नव्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात आलेल्या परीक्षेत मुंबईकर मुलींनी बाजी मारली आहे. मुंबई येथील कोमल जैन ही देशात पहिली, तर राजवी नाथवानी ही तिसरी आली आहे. दुसरा क्रमांक सुरत येथील मुदीत अगरवाल याने पटकावला आहे. या परीक्षेच्या माध्यमातून नव्या अभ्यासक्रमाच्या पाच हजार ३९२ विद्यार्थ्यांना, तर जुन्या अभ्यासक्रमानुसार पाच हजार ६७५ विद्यार्थ्यांना सनद देण्यात आली आहे.

‘इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया’च्या वतीने नोव्हेंबर २०२० मध्ये जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात आलेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. नव्या अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत पहिल्या आलेल्या कोमल जैन हिला ८०० पैकी ६०० गुण मिळाले आहेत. दुसऱ्या आलेल्या मुदीत अगरवाल याला ५८९ गुण, तर तिसऱ्या स्थानी असलेल्या राजवी नाथवानी हिला ५८७ गुण मिळाले आहेत.

जुन्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत सालेम येथील इसाकीराज ए (५५३ गुण) हा प्रथम आला आहे. चेन्नई येथील श्रीप्रिया आर. (५०१ गुण) दुसरी, तर जयपूर येथील मयांक सिंग (४८९ गुण) तिसरा आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *