ठाणे, भिवंडी, नाशिक आणि गुजरात येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पूर्व द्रुतगती मार्गावरील माजिवडा ते शीव या रस्त्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे.
ठाणे शहरातून जाणारा मुंबई-नाशिक महामार्गावरून (पूर्व द्रुतगती) दररोज हजारो वाहने मुंबईच्या दिशेने ये-जा करतात. त्यामध्ये अवजड वाहनांची संख्या मोठी आहे. या मार्गावरील काही उड्डाणपूल राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत आहेत. तर त्याखालील रस्ते मात्र एमएमआरडीएच्या आखत्यारीत आहेत. या रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. तसेच रस्ता नादुरुस्त असल्यामुळे त्याचा वाहतुकीवरही परिणाम होतो. यावरून एमएमआरडीएच्या कारभारावरही टीका होत आहे. या टीकेनंतर आता एमएमआरडीएने माजिवडा येथील गोल्डन डाईज नाका ते मुंबईतील शीव पर्यंतच्या रस्त्याचे पाच टप्प्यांमध्ये नूतनीकरण करून त्यावर डांबराचा मुलामा देण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी एमएमआरडीएने निविदाही काढली आहे. त्यानुसार २३.५ किमीच्या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी १३३ कोटी ८१ लाख ३२ हजार ६७९ रुपये खर्च करण्यात येणार आहे. रस्त्यालगत असलेल्या पदपथांची दुरुस्ती, दुभाजकांचे नूतनीकरण तसेच ज्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते आहेत, तिथे तडे गेलेल्या भागाची दुरुस्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएचे सहआयुक्त बी. जी. पवार यांनी दिली.
कामाचे टप्पे
- मुंबईतील छेडानगर ते शीव जंक्शन (खर्च २९ कोटी ३ लाख ८१ हजार ९०५)
- विक्रोळी गाव ते छेडानगर (खर्च २४ कोटी ६३ लाख ९६ हजार २३३)
- भांंडूप येथील उषा नाला ते विक्रोळी गाव (खर्च २५ कोटी ७८ लाख ३८ हजार ८५२)
- ठाण्यातील जुना जकात नाका ते उषा नाला (खर्च २७ कोटी ६६ लाख ४७ हजार ११३)
- माजिवडा गोल्डन डाईज नाका ते जुना जकात नाका (खर्च २६ कोटी ६८ लाख ६८ हजार ५७६)
