बोईसर रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेले फेरीवाले व खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांनी अनेक दुकाने थाटली असून भर रस्त्यावर एलपीजी सिलेंडरचा वापर करून खाद्यपदार्थ तयार करण्याची दुकाने आहेत. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण होत असून त्याविषयी शासकीय विभागांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही.
बोईसर रेल्वे स्थानकाचा परिसर गजबजलेला असून त्याठिकाणी हजारोच्या संख्येने कामगार वर्ग प्रवास करत असतो. त्याचप्रमाणे बोईसर पूर्वेकडे मोठी कामगार रहिवासी वसाहत असून रेल्वे स्थानकावरील उड्डाणपुलाचा वापर करून हे नागरिक पूर्वपश्चिाम प्रवास करताना दिसतात. अशा परिस्थितीत बोईसर रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेले खाद्यपदार्थांच्या दुकानांमध्ये एलपीजी सिलेंडरचा राजरोसपणे वापर केला जातो. हे एलपीजी सिलेंडर उघड्यावर ठेवली जात असून लगतच्या भागातून गर्दीचा वावर असल्याने सार्वजनिक सुरक्षिततेला धोका पहोचण्याची शक्यता आहे.
यापूर्वी उघड्यावर असलेल्या सिलेंडर स्फोटात अनेकजण बाधित झाले होते व अनेकांचा मृत्यू झाला होता. असे असताना अशा चुकीच्या पद्धतीने उघड्यावर गॅसचा वापर करणाऱ्यांविरुद्ध पोलीस तसेच संबंधित विभागांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने या दुकानांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बोईसर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून रस्त्यावर खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या विक्रेते व त्यांच्या गाड्या असताना ग्रामपंचायत सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा इतर विभागांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.

