रिक्षाचालकांकडून लूट सुरूच

सोमवारपासून मागील भाडेदराप्रमाणेच म्हणजेच प्रति प्रवासी दहा रुपये भाडे घेण्याचे आवाहन डोंबिवली रिक्षाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते. मात्र, काही रिक्षाचालकांनी हे आवाहन धुडकावून लावत दहाऐवजी वीस रुपये भाडे आकारणी सुरूच ठेवली असून त्याचबरोबर त्यांनी जास्त भाडे देण्यास नकार देणाऱ्या प्रवाशांसोबत वादही घातल्याचे प्रकार घडले आहेत. अशा रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत असून त्यावर संघटना आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी रिक्षातून दोनच प्रवाशांची वाहतूक करावी, असे आदेश परिवहन विभागाने टाळेबंदी शिथिलीकरणानंतर दिले होते. मात्र, चारऐवजी दोनच प्रवाशांची वाहतूक करावी लागत असल्यामुळे रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून दुप्पट भाडेआकारणी सुरू केली होती. प्रति प्रवासी दहा रुपयांऐेवजी २० रुपये भाडे आकारले जात होते. अशा प्रकारची आकारणी करावी यासाठी परिवहन विभागाने कोणतेही लेखी आदेश रिक्षा संघटनांना दिले नव्हते. तरीही बेकायदेशीरपणे भाडेवाढ लागू करण्यात आली होती. मात्र, शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता सर्वच व्यवहार पूर्वपदावर आल्याचे चित्र आहे. तसेच रिक्षामधूनही आता दोनऐवजी चार प्रवाशांची वाहतूक केली जात आहे. असे असले तरी चालकांकडून आजही दुप्पट भाडेच आकारले जात आहे. याबाबत प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटत होता. दरम्यान, रेल्वेच्या लोकलमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश लागू झाल्याने रिक्षा प्रवासी संख्येतही वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून रिक्षातून तीनच प्रवाशांची वाहतूक करण्याचे आणि प्रति प्रवासी दहा रुपये भाडे आकारण्याचे आदेश डोंबिवली रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यास काही रिक्षाचालकांनी प्रतिसाद दिला तर काही चालकांनी संघटनेचे आवाहन धुडकावून लावत दुप्पट भाडे वसूल केले, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *