लोकलमधून प्रवास करण्यासाठी मुखपट्टीविना स्थानकात दाखल झालेल्या ५७१ प्रवाशांविरोधात सोमवारी रेल्वे पोलिसांनी कारवाई केली. दंड आकारून या प्रवाशांना स्थानकातून माघारी पाठवण्यात आले.
रेल्वे पोलीस आयुक्तालयातून मिळालेल्या माहितीनुसार राज्य रेल्वे पोलीस (जीआरपी), रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) पालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने ही कारवाई केली. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ५७१ प्रवाशांकडून दंड वसूल करण्यात आला.
प्रतिबंधित वेळांत काही प्रवाशांनी प्रवासासाठी परवानगी देण्याची आग्रही मागणी केली, मात्र त्या प्रत्येकाला रोखण्यात आले, अशी माहिती आरपीएफचे वरिष्ठ अधिकारी जितेंद्र श्रीवास्तव यांनी दिली.

