जेएनपीटी येथील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांचे भवितव्य जेएनपीटी प्रशासनाने धोक्यात आणले आहे. येथील गेले 30 वर्षे सुरू असलेल्या या शाळेच्या हस्तांतरणाचा घाट घालून शाळेच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांवर अन्याय केला आहे. जेएनपीटी प्रशासनाने शून्य बजेटचे नाटक करून निविदा काढून रुस्तमजी केरावाला फाऊंडेशनसोबत हितसंबंध जोडून सर्वांची फसवणूक केल्याच्या निषेधार्थ मंगळवार, दि.2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता टाऊनशिप येथील रुस्तमजी केरावाला फाऊंडेशन शाळा प्रशासनाला जाब विचारण्यासाठी एकत्र जमणार असल्याची माहिती शालेय कर्मचार्यांनी बोलताना दिली.
जून 1990 सालापासून जेएनपीटी टाऊनशिप येथे असणार्या इंडीयन एज्युकेशन सोसायटीची शाळा 30 जून 2019 पर्यंत कार्यरत होती. या शाळेमध्ये मराठी व इंग्रजी अशी दोन माध्यमे असून, विद्यार्थ्यांची संख्या 3 हजार 500 इतकी होती. या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जवळपास 74 शिक्षक व 40 कर्मचारी असे मिळून 114 कर्मचारी कार्यरत होते. या सर्वांना जेएनपीटी कडून पगार देण्यात येत होता. संस्थेचे वार्षिक आर्थिक बजेट साधारण 6 कोटी इतके होते. त्यापैकी जेएनपीटी साडेतीन कोटी रुपये इंडियन एज्युकेशन सोसायटीला दिले जात होते. तसेच उर्वरित बाहेरची भरपाई ही विद्यार्थ्यांच्या फिमधून मिळत होती. यामध्येही प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांना 50 टक्के सवलत देण्यात आली होती. जेएनपीटीकडून मिळणार्या साडेतीन कोटी रूपयांपैकी संस्थेला 30 हजार रुपये प्रति महिना मिळत होते. अशा प्रकारे 30 वर्षे ही संस्था व्यवस्थितपणे आपले काम करीत होती. यामध्ये शाळेचे व्यवस्थापन, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि जेएनपीटी प्रशासनाचा समन्वय अतिशय चांगल्या प्रकारे होता.
या प्रकरणात माशी नेमकी कुठे शिंकली, हे समजण्याच्या आतच 01 जुलै 2019 पासून जेएनपीटीने निविदा काढल्या. या निविदेमध्ये रुस्तामजी केरावाला फाऊंडेशन मुंबई यांना ही निविदा मिळाली. जेएनपीटीच्या म्हणण्यानुसार ही निविदा शून्य बजेटवर चालविण्यासाठी काढण्यात आली होती. असे असताना सुद्धा जेएनपीटीचे अधिकारी यांनी रुस्तमजी केरावाला यांचे हितसंबंध जपण्यासाठी शून्य बजेटवर शाळा चालविण्याचा नियम डावलून केरावाला फाऊंडेशनला प्रती वर्षी 1 कोटी 90 लाख रुपये अधिक प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांची 50 टक्के फी जी जेएनपीटी भरते, ती सुद्धा आजमितीस फाऊंडेशनला देत आहे.
आजही फाऊंडेशन आणि जेएनपीटी यांच्यामध्ये झालेला समन्वय करार हा गुलदस्त्यात असून याबाबत खएड मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना माहीत नाही. त्याचप्रमाणे जेएनपीटीनेसुद्धा करार होऊन देखील आयईएसमधील शिक्षक व कर्मचारी कायम ठेवून करार केला असल्याचे समजते. असे असतानासुद्धा फाऊंडेशनने आजच्या तारखेस कर्मचार्यांना सेवेतून निलंबित करण्याचे लेखी आदेश जारी केले आहेत. यामुळे ज्यांना हे आदेश मिळाले त्या सर्व कर्मचार्यांनी आपली 25 वर्षे सेवेत चांगल्या प्रकारची सेवा दिली आहे. आदेश मिळाल्यामुळे सर्व कर्मचार्यांमध्ये घबराट निर्माण झाली असल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे.
या असंतोषामुळे उर्वरित शिक्षकांचे भवितव्य जसे धोक्यात आले आहे, तसेच शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी यांचेही शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. यामुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. यासाठीच मंगळवारी 02 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता शाळेच्या संबंधित प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शाळेच्या गेटवर एकत्र जमणार आहेत.
