७ राज्यात बर्ड फ्लुने थैमान घातलं असताना आता राज्यातही या बाबतची गंभीरता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी बर्ड फ्ल्यूच्या संसर्गाबाबत बैठक बोलावली आहे. राज्यात घडत असलेल्या पक्षांच्या मृत्यूच्या घटनांबाबत आढावा घेतला जाईल आणि त्यावर चर्चा होऊन पुढील दिशा ठरवण्यात येईल. आज संध्याकाळी ५ वाजता ही बैठक होणार आहे.
२००६ पेक्षा आत्ताचा बर्ड फ्लू वेगळा आहे त्यामुळे कोणत्याही पोल्ट्रीचालकांनी माहिती लपवू नये असं आवाहन पशू संवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केलं आहे. एकटया परभणी जिल्ह्यात ८० हजार कोंबड्या माराव्या लागणार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. ७० ते ८० डिग्री सेल्सिअसवर चिकन अर्धातास शिजवून खाण्यास हरकत नाही असं सुनील केदार यांनी स्पष्ट केलं आहे. पुणे आणि नागपुरात भोपाळच्या लॅबच्या तोडीची लॅब तयार कऱण्यात आलीय. तिथे सँपल टेस्टींगची परवानगी लवकरच मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

