डोक्यात बॅट मारल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

क्रिकेट खेळताना झालेल्या वाद एका १३ वर्षीय मुलाच्या जीवावर बेतला आहे. खेळताना झालेल्या किरकोळ वादातून डोक्यात बॅट मारल्याने पेण शहरातील कुंभार आळी परीसरात प्रेम दळवी या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मंगेश रघुनाथ दळवी हे मूळचे मांगरूळ गावचे रहिवासी असून सध्या ते पेण येथील कुंभार आळीतील सद्गुरू पार्क सोसायटीत कुटुंबीयांसोबत राहतात. मंगेश दळवी यांचा मुलगा प्रेम दळवी (वय १३) हा सोसायटीतील मित्रांसोबत शनिवारी सायंकाळी सोसायटीच्या आवारातच क्रिकेट खेळत होता. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास खेळताना मुलांचा आपआपसात वाद झाला. या किरकोळ वादातून प्रेमच्या डोक्यावर तिथे खेळत असणाऱ्या दुसऱ्या एका १४ वर्षीय मुलाने बॅटची उपट मारली. ही बॅट प्रेमच्या डोक्याच्या मागील बाजूस जोरात लागल्याने गंभीर दुखापत होऊन प्रेम जागीच खाली कोसळला. ही गोष्ट रहिवाशांना कळताच ते प्रेमला रुग्णालयात घेऊन गेले. पण पेण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *