तालुका कृषी अधिकारी कार्यालय, डहाणू यांचेमार्फत आत्मा योजनेअंतर्गत कासा व वाणगाव कृषी मंडळातील शेतकऱ्यांना उन्हाळी भातपीक प्रात्यक्षिकासाठी ‘बर्मा ब्लॅक चकाऊ’या जातीच्या काळा भात बियाण्याच्या वाटपाचा कार्यक्रम विभागीय कृषी सहसंचालक, कोकण विभाग प्रमोद लहाळे यांच्या हस्ते वेती व निकावली येथे पार पडला. यावेळी तालुका कृषी अधिकारी डहाणू संतोष पवार उपस्थित होते. पेठ, नगर, नासिक भागात काळा भाताचे उत्पादन घेतले जाते. डहाणू तालुक्यातील उन्हाळी भातशेती करणाऱ्या गंजाड, निकाणे, रानशेत, ओसवरी, मुरबाड, धामटणे, पेठ व तवा या सात गावांमधील २५ शेतकऱ्यांना पाच किलो प्रति शेतकरी याप्रमाणे काळा भात बियाण्यांचे वाटप करण्यात आले असून चारसूत्री पद्धतीने लागवड करण्याचे नियोजन आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडून २० गुंठे जमिनीवर या वाणाची लागवड होणार असून साडेबारा एकर जमिनीवर उत्पादित होणाऱ्या भाताचा नंतर बियाणे म्हणून वापर होणार आहे.
कर्करोग रोखण्यासाठी पूरक असलेले धान्य म्हणून त्याला ओळखले जाते. काही भागात त्याला कर्करोग-लढाऊ तांदूळ असे देखील म्हणतात. पांढऱ्या तांदळाऐवजी घरगुती व्हेगी बर्गरमध्ये शिजवलेला काळा तांदूळ घालून किंवा ताज्या भाजलेल्या भाज्या आणि आपल्या आवडत्या प्रथिनेसह त्याचे सेवन केले जाते. लठ्ठपणा कमी होतो. तसेच पचनासाठी चांगला, रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा आहे. त्वचा, मेंदू आणि डोळ्यांसाठीही फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे दावा आहे.

