निंबुत (ता. बारामती) येथील शेतकरी दीपक विनायक जगताप यांनी त्यांच्या अथक परिश्रमाने त्यांच्या वडिलोपार्जित सहा एकर पडीक माळरानावर अंजिराची बाग फुलविली आहे.
पाच लाख रुपये खर्चून जगताप यांनी माळरानाचे सपाटीकरण केले. वीर धरणातील कालव्याजवळ असणाऱ्या विहिरीतून दोन कि.मी. अंतरावरून माळरानावर पाणी आणले. सुरुवातीला त्यांनी भाजीपाला, ऊस घेण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी डाळिंब, संत्रा आणि अंजीर या फळपिकाची लागवड केली. त्यातही अंजीर फळ किफायतशीर ठरले. चांगल्या पगाराची नोकरी सोडून बंधू गणेश यांच्यासमवेत त्यांनी अंजीर पिकाची जोपासना केली. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे त्यांच्या मालाला चमक, गोडवा व टिकाऊपणा चांगला मिळाला. गेली दोन वर्षे अतिवृष्टिमुळे अंजिराचे आगार असलेल्या पुरंदर तालुक्यातील अनेक बागांचे नुकसान झाले. मात्र, बागेचे योग्य व्यवस्थापन आणि पाण्याचा निचरा केल्यामुळे अतिवृष्टीमुळेही जगताप यांचे काही नुकसान झाले नाही. अंजिराच्या उत्पादनापासून त्यांना वर्षांला खर्च वजा करून सहा लाख रुपयांचा नफा झाला. त्यांची अंजीर बाग पाहण्यासाठी कृषि क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली आहे.
जगताप यांच्या कामाची दखल घेऊन राज्य शासनाने २०१८ मध्ये अंजीररत्न पुरस्काराने आणि २०१९ मध्ये शेती प्रगती कृषिभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. अंजीर शेतीचा अभ्यास आणि संशोधनाचा फायदा अन्य शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी त्यांची अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संशोधक संघाच्या संचालकपदी निवड केली आहे.

