जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोरोना संसर्गग्रस्त रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. संसर्गाची साखळी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी दि. ७ जुलै ते २१ जुलै २०२० च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. या लॉकडाऊन कालावधीत नागरिकांनी नियमांचे पालन करीत संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियाेजन समिती सभागृहात पालकमंत्री यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर मलकापूरचे आमदार राजेश एकडे, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ उपस्थित होते.
जिल्ह्यात मलकापूर, नांदुरा आणि मोताळा तालुक्यात यापूर्वीच १५ जुलैपर्यंत प्रशासनाने संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश लागू केले आहे. या तालुक्यांमध्ये १५ जुलै नंतर २१ जुलै पर्यंत जिल्ह्याचे एकत्रित आदेश लागू होणार आहेत. मलकापूर उपविभाग वगळता या लॉकडाऊन कालावधीत सर्व दुकाने सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उघडण्यास मुभा असणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शिंगणे यांनी दिली.
तसेच त्याच दिवशी दुपारी ३ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत अत्यंत कडक कर्फ्यू लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवा असणाऱ्या नागरिकांना लॉकडाऊन कालावधीत प्रशासनाकडून पासेस वितरित करण्यात येतील. जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही. जिल्ह्यात प्रशासनाने चांगले कार्य करीत, समन्वय ठेवत कोरोनाला नियंत्रित ठेवण्यात बऱ्यापैकी यश मिळविले आहे, असे ते म्हणालेत.