बँकेतून बोलत असल्याचे सांगून नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच आहेत. बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून बोलत असल्याची बतावणी करून सायबर चोरट्याने एका ज्येष्ठ महिलेला एक लाख ६८ हजार रुपयांना फसविले.
ही घटना कोंढवा येथील एनआयबीएम रस्ता परिसरातील एका इमारतीत घडली. बँक खात्याची पडताळणी सुरू असल्याचे सांगून या चोरट्याने ज्येष्ठ महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून एटीएम कार्डची सविस्तर माहिती विचारून घेऊन त्यांची फसवणूक केली. याबाबत एका ८७ वर्षीय महिलेने कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिला पतीसह कोंढव्यातील कोणार्क इंद्रयू एनक्लेव्ह इमारतीत राहायला आहे. काही दिवसांपूर्वी त्या घरी असताना सायबर चोरट्याने या महिलेला फोन करून बँक ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे सांगितले. महिलेचा विश्वास संपादन करून चोरट्याने एटीएम कार्डची गोपनीय माहिती विचारून घेतली. त्यानंतर ऑनलाइनद्वारे बँकखात्यातून एक लाख ६८ हजार रुपये स्वत:च्या खात्यात वर्ग करून फसवणूक केली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक महादेव कुंभार अधिक तपास करीत आहेत.