कोथरूड येथील गांधी भवन परिसरात भरदिवसा गॅरेजचालकाच्या डोक्यात शस्त्राने वार करून खून करण्यात आला. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. राकेश क्षीरसागर (वय २३, रा. लक्ष्मीनगर, डहाणूकर कॉलनी) असे या गॅरेजचालकाचे नाव आहे. जुन्या वादातून हा खून करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्षीरसागर याचे गांधी भवन परिसरातील एका कॉम्प्लेक्समध्ये दुचाकी दुरुस्तीचे दुकान आहे. सोमवारी दुपारी तो गॅरेजमध्ये दुचाकी दुरुस्त करीत असताना अचानक काही व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी त्याच्याशी वाद घातला आणि त्याच्या डोक्यात कोयता व इतर लोखंडी हत्याराने वार केले. या हल्ल्यामध्ये क्षीरसागर गंभीर जखमी झाल्याने त्याला नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी, पोलिस निरीक्षक किरण बालवडकर यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते.