लॉकडाऊनच्या काळात मैलो न् मैलांचा प्रवास करत आपल्या गावाकडे पायी चालत आणि ट्रेनने गेलेल्या मजुरांना पुन्हा परत बोलावण्यासाठी बिल्डर सक्रिय झाले आहेत. पायी किंवा ट्रेनने गेलेल्या या प्रवाशांना परत आणण्यासाठी थेट कार पाठवली जात आहे. काही बिल्डरांनी तर या मजुरांसाठी थेट विमानांचं तिकिटच बुक केलं आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी खायला मोताद झालेल्या मजुरांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
करोनाचा प्रादुर्भाव आणि सतत वाढत जाणारा लॉकडाऊन त्यामुळे हवालदिल झालेले मजूर यूपी, बिहारमधील आपल्या गावाकडे महाराष्ट्रातून पायी चालत गेले होते. अनेक अडचणींवर मात करून या मजुरांनी गाव गाठले होते. तर राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नानंतर श्रमिक ट्रेन सुरू झाल्यावर हजारो मजूर ट्रेनने गावाला गेले होते. मात्र, आता राज्यात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून अनेक उद्योगांना सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्यातील अर्थचक्र गतिमान करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. मात्र, आता कारखाने, बांधकाम व्यवसायात मजुरांची प्रचंड कमतरता असल्याने व्यावसायिक, उद्योजक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे बिल्डरांनी या मजुरांना परत बोलावण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे.
गावाकडेही काम नसल्याने अनेक मजुरांना महाराष्ट्रात परतायचे आहे. मात्र, रेल्वेची तिकिटं मिळत नसल्याने त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बिल्डरांनी मजुरांना आणण्यासाठी थेट कार पाठवण्यास सुरुवात केली आहे. तसेच साइड सुपरव्हायजर आणि प्रमुख पदांवरील कामगारांना विमानांची तिकिटं बुक करून दिली जात आहेत. आम्ही आतापर्यंत १०-१२ मजुरांना फ्लाइटने बोलावले आहे. अन्य मजुरांना गाडीने बोलावले आहे. सध्या कामं वेगाने सुरू झालेली नाहीत, मात्र, मजुरांना बोलावणंही तितकच महत्त्वाचं होतं. सरकारने विमानाच्या प्रवासाचे दर नियंत्रणात ठेवल्याने आम्हाला मजुरांसाठी ही सुविधा देणं सोपं गेलं, अशी माहिती रौनक ग्रुपचे राजन बांदेकर यांनी सांगितलं.
साइटवर काम करण्यासाठी मजुरांना कोणत्याही परिस्थितीत परत बोलावणं आवश्यक आहे. बिहारमधील काही मजुरांना आम्ही विमानाने येण्याचा प्रस्ताव दिला. मात्र, त्यांच्या घरापासून विमानतळ खूप लांब असल्याने त्यांना कारचं भाडं देण्याची ऑफरही देण्यात आली आहे, असं प्रजापती कन्स्ट्रक्शनचे राजेश प्रजापती यांनी सांगितलं. तर आमचे मजूर मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये आहेत. त्यांना मुंबईत आणण्यासाठी हवी ती साधने उपलब्ध करून दिली जात आहेत. एक दोन आठवड्यात हे मजूर परत येतील, अशी आशा आहे. काही मजूर मात्र ईद आणि रक्षाबंधन संपल्यावर येणार असल्याचं सांगत आहेत, अशी माहिती लेबर कॉन्ट्रॅक्टर साजिद गोरी यांनी सांगितलं.