माजी मंत्री सुरेश आमोणकर यांचे कोविड-१९ मुळे सोमवारी निधन झाले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माजी मंत्र्यांना आदरांजली अर्पण केली आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी कोरोनामुळे आमोणकरांचे निधन. राज्याचे माजी आरोग्य मंत्री व गोवा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. सुरेश आमोणकर यांचे सोमवारी रात्री मडगावच्या कोविड रूग्णालयात निधन झाले. आमोणकरांना मूत्रपिंडाचा त्रास होता पण त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा सोमवारी मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांची गोव्यातील संख्या आठवर पोहोचली आहे.
आमोणकर हे पाळी म्हणजे आताचे साखळी मतदारसंघाचे आमदार म्हणून १९९९ आणि २००२ अशा दोन निवडणुकांवेळी निवडून आले. आमोणकर अगोदर फ्रान्सिस सार्दिन यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. त्यानंतर पर्रीकर मंत्रिमंडळात मंत्री होते. आरोग्य खाते सांभाळणारे आमोणकर हे अतिशय मितभाषी, शांती व सौम्य स्वभावाचे डॉक्टर आणि मंत्री होते. आमोणकरांचे मूत्रपिंड निकामी झाले होते. ते डायलसिसवर होते. ते ज्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी जात होते. त्याच रुग्णालयात त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.