मे 2020 च्या सीए परीक्षा रद्द, आता नोव्हेंबर 2020 मध्ये परीक्षा होणार

मे 2020 च्या सीए परीक्षा रद्द करण्यात आल्या असून आता नोव्हेंबर 2020 मध्ये पुढील परीक्षा होणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाने शुक्रवारी (3 जुलै) रात्री उशिरा यासंदर्भात ट्विटरवर पत्रक जारी करुन माहिती दिली.

सुरुवातीला सीए परीक्षा 2 मे ते 18 मे दरम्यान होणार होती. मात्र देशभरातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता परीक्षा पुढे ढकलून 19 जून ते 4 जुलै दरम्यान घेण्याचं ठरलं होतं. मात्र त्यानंतरही ही परीक्षा रद्द करुन जुलै ते ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्याचा निर्णय झाला. 29 जुलै ते 16 ऑगस्टदरम्यान ही परीक्षा पार पडणार होती. मात्र आता ही परीक्षा नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.

नोव्हेंबरच्या परीक्षेसाठी नवा अर्ज
आयसीएआने शुक्रवारी उशिरा यासंदर्भात अधिसूचाना जारी केली. आयसीएआयनुसार, “ज्या विद्यार्थ्यांनी मे 2020 परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यांच्याकडे आता नोव्हेंबर 2020 परीक्षेसाठी नवा अर्ज करताना आपला ग्रुप आणि परीक्षा केंद्र बदलण्याचापर्याय असेल. नोव्हेंबरमध्ये होणारी सीए परीक्षा 1 तारखेपासूनच सुरु होईल. मात्र परीक्षा सुरु होण्याआधी परिस्थितीचा आढावा घेतला जाईल.”

29 जुलै ते 16 ऑगस्टदरम्यान होणाऱ्या सीए परीक्षेच्या आयोजनाची व्यवहार्यता पडताळली जाईल, असं आयसीएआने गुरुवारी (2 जुलै) सर्वोच्च न्यायालयात सांगितलं होतं. देशभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन परीक्षा स्थगित करावी अशी मागणी विद्यार्थी वारंवार करत होते.

याआधी इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी होणारी JEE आणि मेडिकलच्या प्रवेशासाठी होणारी NEET या दोन्ही परीक्षांची तारीख दुसऱ्यांदा पुढे ढकलली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता विद्यार्थ्याचा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्रालयने हा निर्णय घेतला आहे.

नीटची 26 जुलैला होणारी परीक्षा आता 13 सप्टेंबर होणार आहे. तर जेईई मुख्य परीक्षा 18 ते 23 जुलैला होणार होती ती आता 1 ते 6 सप्टेंबर आणि ॲडव्हान्स 27 सप्टेंबरला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही परीक्षांसाठी केंद्र बदलण्याची मुभा देखील विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. 4 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान विद्यार्थी यासाठी ऑनलाइन अर्ज करु शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *