राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक कोरोनाबाधित

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाविरोधात लढणाऱ्या यंत्रणेत देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव होत आहे. मागे मंत्रालयातील काही महत्वाच्या अधिकाऱ्यांना कोरोना झाल्याचं समोर आल्यानंतर आता राज्याच्या कोरोना टास्क फोर्समध्ये कोरोनाने शिरकाव केलाय. कोरोनाबाबतच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील नामवंत आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेमलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संजय ओक यांना कोरोनाची बाधा झाली आहे. मुंबईतील फोर्टिस रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.

डॉ. संजय ओक यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांना ऑक्सिजन सपोर्ट दिल्यानंतर आता त्यांची प्रकृती सुधारली आहे. लवकरच त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 12 एप्रिल रोजी कोविड टास्क फोर्सची घोषणा केली होती. कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी तसेच साथ नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत अभ्यास करून सूचना देण्यासाठी या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. यात वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टरांचा समावेश असून डॉ. संजय ओक हे या टास्कचे प्रमुख आहेत.

या टास्कमार्फत वेळोवेळी सरकारला सूचना देण्यात येत आहेत. टास्क फोर्सचे प्रमुख म्हणून संजय ओक संपूर्ण स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. संजय ओक हे प्रत्यक्ष फिल्डवर जाऊनही ते स्थितीचा आढावा घेत आहेत. यादरम्यानच त्यांना कोरोनाची लागण झाली.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आतापर्यंत जवळपास 80 हजार कोरोना केसेस समोर आल्या आहेत. तर महाराष्ट्रात हा आकडा 1 लाख 75 हजारांच्या जवळपास आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *