इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी होणारी JEE आणि मेडिकलच्या प्रवेशासाठी होणारी NEET या दोन्ही परीक्षांची तारीख दुसऱ्यांदा पुढे ढकलली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता विद्यार्थ्याचा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केंद्रिय मनुष्यबळ विकास मंत्रालयने हा निर्णय घेतला आहे.
नीटची 26 जुलैला होणारी परीक्षा आता 13 सप्टेंबर होणार आहे. तर जेईई मुख्य परीक्षा 18 ते 23 जुलैला होणार होती ती आता 1 ते 6 सप्टेंबर आणि ॲडव्हान्स 27 सप्टेंबरला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही परीक्षांसाठी केंद्र बदलण्याची मुभा देखील विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. 4 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान विद्यार्थी यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
जेईई परीक्षांमार्फत देशभरातील इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो. तर राष्ट्रीय पात्रतेसह घेण्यात येणाऱ्या NEET परीक्षेमार्फत देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो.
देशभरातील 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेसाठी अर्ज केला आहे. या परीक्षेमार्फत देशभरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो. तर 9 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई-मेंस परीक्षेसाठी अर्ज केला आहे. जेईई मेन्स परीक्षेमार्फत आयआयटी वगळता इतर इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येतो. जेईई मेन्स परीक्षा जेईई अॅडवान्स परीक्षेसाठी महत्त्वाची मानली जाते. जेईई अॅडवान्स परीक्षेमार्फत आयआयटीमध्ये प्रेवश देण्यात येतो.