ठाणे जिल्हा डेंजर झोनमध्ये; एक्टिव्ह रुग्णसंख्येत मुंबईलाही टाकले मागे

राज्यातील कोरोना प्रादुर्भावाचे केंद्र आता मुंबईतून ठाण्यात सरकण्याची शक्यता आहे. कारण, शुक्रवारी समोर आलेल्या आकडेवारीनंतर एक्टिव्ह रुग्णसंख्येत ठाणे जिल्ह्याने मुंबईला मागे टाकल्याचे स्पष्ट झाले. सध्याच्या घडीला मुंबईत २४९१२ तर ठाण्यात २५३३१ एक्टिव्ह रुग्ण आहेत. ही बाब ठाणे जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. ठाणे जिल्ह्यात येणाऱ्या नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याशिवाय, प्रत्यक्ष ठाण्यातही वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ ओढावली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ठाणे जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाविषयी चिंता व्यक्त केली होती. २७ जून रोजी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील पालिका आयुक्तांची व इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये युद्धपातळीवर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सर्व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये  कोरोना रुग्ण शोधण्याबरोबरच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा वेग वाढवण्यात आला आहे.

रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांवर तातडीने निश्चित केलेल्या कार्यपध्दतीनुसार पुढील उपचार करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट निर्देश महापालिकांच्या आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातही मुंबई पॅटर्नचा अवलंब करावा, अशा सूचना दिल्या होत्या. मुंबईत रुग्णांच्या प्रकृतीनुसार त्यांचे वर्गीकरण करुन त्यांना उपचार दिले जातात. ही पद्धत ठाणे जिल्ह्यातही राबवावी. याशिवाय, डॉक्टर्स व परिचारिका, इतर वैद्यकीय कर्मचारी हे मनुष्यबळ तिथल्या तिथे लगेच कसे उपलब्ध होईल, याची व्यवस्था करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी सर्व महापालिकांच्या आयुक्तांना दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *