राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई, पुण्यासह अन्य शहरांमध्येही करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज नवी मुंबईत १५० नवे करोना रुग्ण वाढले आहेत. तर सात जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असून, मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत.आज शहरात १५० नवे रुग्ण वाढले असून, शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या ६ हजार ३ झाली आहे. शहरात आज ७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या २०१ झाली आहे. शहरात करोनामुक्त होण्याचा दर चांगला असून, शहरात आतापर्यंत ६ हजार ३ रुग्णांपैकी तब्बल ३ हजार ४०५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
काल शहरात २२४ नवे रुग्ण वाढले होते. तर, ५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. पालिका प्रशासनाने नवी मुंबईमधील १० कंटेनमेंट झोन सोमवारी २९ जूनपासून ५ जुलैपर्यंत प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या ८ दिवसात अत्यावश्यक सेवा वगळता निश्चित करण्यात आलेल्या कंटेनमेंट झोनमध्ये टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे.