माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार संजय बारू यांची ऑनलाइन ऑर्डर करताना फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. ऑनलाइन दारू ऑर्डर करताना संजय बारू यांना २४ हजार रुपयांचा गंडा घातल्याचं वृत्त असून याप्रकऱणी दिल्ली पोलिसांनी एकाला अटकही केली आहे.
संजय बारू यांनी फेसबुकवर La Cave Wine shop या नावाच्या एका पेजवरुन दारुच्या होम डिलिव्हरीसाठी ऑर्डर दिली. त्यावर एका व्यक्तीने बारु यांना ऑर्डरसाठी २४ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास सांगितले. बारु यांनी पैसे ट्रान्सफर केल्यानंतर मात्र तो नंबर स्विच ऑफ झाला. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच बारु यांनी दिल्लीच्या हौज खास पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार केली.
पोलिसांच्या तपासात आरोपीचं खोट्या नावाने अनेक बँकांमध्ये अकाउंट असल्याचं उघड झालं. वेगवेगळ्या सीमकार्ड्सवरून तो ग्राहकांना फोन करायचा आणि देशातल्या विविध बँकांमधल्या अकाउंटसमध्ये ते पैसे ट्रान्सफर करायचा. “तपासामध्ये बारु यांचे पैसे पंजाब नॅशनल बँकेच्या आकिब जावेद नावाच्या व्यक्तीच्या खात्यात वळवण्यात आल्याचं लक्षात आलं. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या पथकाने राजस्थानच्या भरतपूर येथील त्याच्या राहत्या घरातून आरोपीला ताब्यात घेतलं” अशी माहिती पोलिसांनी दिली.
खोट्या सिमकार्ड्सचा वापर करुन अनेकांची ऑनलाइन फसवणूक केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. आरोपी 8 वी पास असून तो कॅब ड्रायव्हर आहे. झटपट पैसे कमावण्यासाठी तो सायबर क्राइम करायचा असं पोलिसांनी सांगितलं.