करोना संक्रमण आटोक्यात येत नसल्याने पूर्व उपनगरातील भांडुपमध्ये सुरू असलेल्या टाळेबंदीचा कालावधी ५ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या रुग्णसंख्येत भांडुप मुंबईत चौथ्या क्रमांकावर असून, या भागात दररोज १०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत.
मुंबईतील रुग्णवाढीचा आणि रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावलेला असला तरी, टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर काही भागांत संक्रमण वाढू लागले आहे. पश्चिम उपनगरातील दहिसर, बोरिवली, मालाड, अंधेरी आणि पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडुपमध्ये रुग्ण मोठय़ा संख्येने आढळू लागले आहेत. त्यातही भांडुपमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून रोज शंभरच्या वर रुग्णांची नोंद होत आहे. संपूर्ण मुंबईतील रुग्णवाढीचा दर १.७१ टक्के असताना एकटय़ा भांडुपमधील रुग्णवाढीचा दर ३ टक्के आहे. २४ जूनला येथे १०३, २५ जूनला १२१, २६ जून रोजी ११८ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे पालिका प्रशासनाने आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
दुकानांमध्ये खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणावर लोकांची गर्दी होत असल्यामुळे १९ जूनपासून या भागात कठोर टाळेबंदीची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानुसार २६ जूनपर्यंत केवळ अत्यावश्यक दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र तरीही रुग्णसंख्या वाढतच असल्यामुळे ही टाळेबंदी ५ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. या कालावधीत प्रतिबंधित क्षेत्रांत भाजीविक्री, फळविक्री, फेरीवाले, अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. या भागातील लहान रस्ते, गल्ल्या आधीच प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत.
भांडुपमधील रुग्णसंख्या
१९ जून – ३,३९९
२८ जून – ४,११९
रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी – २६ दिवस