रागाच्या भरात विहिरीत उडी मारलेल्या पतीला वाचविण्यास गेलेल्या पत्नीचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण रेलवाडी येथे घडली. त्यांच्यापाठोपाठ पळत गेलेली बहीण तोल जाऊन विहिरीत पडली मात्र ती तिला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, कोकमठाण रेलवाडी येथे शनिवारी, २७ जून रोजी रात्री दहा वाजता किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पतीने विहिरीत उडी मारून जीव दिला तर त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ज्ञानेश्वर तुकाराम खोतकर (वय ३०), पत्नी सविता खोतकर (वय २५) अशी मृतांची नावे आहेत. त्यांना पाहण्यासाठी बहीण जनाबाई खोतकर ही विहिरीकडे गेली असता तोल जाऊन तीही विहिरीत पडली परंतु ग्रामस्थांना तिला वाचविण्यात यश आले. रविवारी दुपारी शोकाकुल वातावरणात मयत खोतकर पतीपत्नी यांच्यावर त्यांच्यावर रेल वाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
या बाबतची खबर मयताचे पिता तुकाराम कचरू खोतकर (वय ६०) कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिली असून या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भारत नागरे हे करीत आहेत.