कोरोनाचं जगभरात थैमान सुरु असताना भारतात देखील आता त्याचा कहर सुरु आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आढळत आहेत. मुंबई आणि ठाण्यात रोज कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मंगळवारी शिवसेनेच्या एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी ठाण्यातील राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ठाण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकुंद केणी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर मुंबईतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी मीरा-भाईंदरचे शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हरिश्चंद आंमगावर यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी कोरोनाचे 145 रुग्ण वाढले होते. आतापर्यंत ठाण्यात कोरोनाचे 4343 रुग्ण आढळले असून 1947 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ठाण्यात आतापर्यंत 129 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 2267 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.