कार्टून पाहू दिलं नाही म्हणून एका १३ वर्षीय मुलानं घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बिबवेवाडी परिसरात घडली. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या मुलानं सहावीची परीक्षा दिली होती. त्याला टीव्हीवर कार्टून पाहण्याची सवय लागली होती. मंगळवारी सकाळपासूनच तो टीव्हीवर कार्टून पाहत होता. त्याच्या घरच्यांनी त्याला अनेकदा सांगूनही त्यानं घरच्यांचं ऐकलं नाही. शेवटी घरातल्यांनी टीव्ही बंद करून ते बाहेर गेले. त्याचा मुलाला राग आला. त्यानं स्कार्फच्या साह्यानं घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांना प्रकार समजताच त्याला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी ससून रुग्णालयात नेण्यास सांगितलं. मुलानं आत्महत्या केल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी मृत मुलाच्या पालकांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. या घटनेत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत मुलाच्या एका नातेवाईकानं सांगितलं की, ‘सकाळपासूनच मुलगा टीव्हीवर कार्टून बघत होता. टीव्ही बंद कर असं त्याला घरच्यांनी बऱ्याचदा सांगितलं. पण त्यानं काही ऐकलं नाही. शेवटी त्याच्या बहिणीनं टीव्ही बंद केला. त्यानंतर मुलगा रागानं आतल्या खोलीत गेला. बराच वेळ झाला तरी तो काही परत आला नाही. त्यामुळं आईनं जाऊन बघितलं. स्कार्फच्या साह्यानं गळफास घेतलेल्या अवस्थेत तो दिसला. हे पाहून तिला धक्काच बसला. तिनं हंबरडा फोडला.