‘करोना रुग्णाचा मृतदेह उचला’, नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी शिकवला धडा

एकीकडे देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून परिस्थिती अद्यापही नियंत्रणात नाही. याच पार्श्वभूमीवर लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण अनेक ठिकाणी लॉकडाउनच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन केलं जात आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या अशा नागरिकांनी धडा शिकवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी चांगलीच शक्कल लढवली.

गेल्या आठवड्यात पोलिसांना काहीजण नियमांचं उल्लंघन करताना आढळले. यावेळी पोलिसांनी त्यांना शिक्षा म्हणून करोना रुग्णाचा मृतदेह उचलण्यास सांगितलं. पीपीई किट घालून हा मृतदेह उचला असं पोलिसांनी त्यांना सांगितलं. वास्तवात तिथे कोणताही मृतदेह नव्हता.

नियमांचं उल्लंघन करणारे हे तरुण दुचाकीवरुन चालले होते. पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना पकडलं. पोलिसांनी यावेळी त्यांना करोना रुग्णाचा मृतदेह आफल्या खांद्यावर उचलण्यास सांगितलं. ही शिक्षा ऐकताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण अखेर त्यांनी मृतदेह उचलला. पोलिसांनी त्यांना पुन्हा असं काम करणार नाही, करोनापासून बचाव करणार आणि दुसऱ्यांनाही सांगणार अशा घोषणा द्यायला लावल्या.

पण या ठिकाणी कोणत्याही करोना रुग्णाचा मृतदेह नव्हता. पोलिसांनी शक्कल लढवत एका कर्मचाऱ्यालाच स्ट्रेचरवर झोपवलं होतं. नियमांचं उल्लंघन करणाऱ्य़ांना धडा शिकवण्यासाठी तसंच इतरांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी हे करणं गरजेचं होतं असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *