भोपाळमध्ये एका महिलेने Covid-19 च्या टेस्टसाठी स्वॅब दिल्यानंतर लगेच बस पकडली. या महिलेने बसमधून जवळपास २७० किलोमीटरचा प्रवास केला. या महिलेचा करोना व्हायरसचा टेस्ट रिपोर्ट आता पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या महिलेने ज्या बसमधून प्रवास केला, त्या बसमधील सर्वच्या सर्व ३७ प्रवाशांना क्वारंटाइटन करण्यात आले आहे. मध्य प्रदेशच्या दामोहमध्ये ही घटना घडली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
टेस्ट रिपोर्ट येईपर्यंत महिलेला बस प्रवासाची परवानगी द्यायला नको होती, असे दामोहचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तुळसा ठाकूर यांनी म्हटलं आहे. आमच्याकडून काहीही चूक झालेली नाही असा भोपाळमधील अधिकाऱ्यांचा दावा आहे. आम्ही लगेच पावले उचलली असे भोपाळमधील प्रशासनाच्या प्रवक्त्याने सांगितले. ही महिला मजूर आहे. प्रशासनाने मजुरांना त्रास होऊ नये यासाठी बसेसची व्यवस्था केली आहे. मजुरांना बसमध्ये बसण्याची परवानगी देण्याआधी त्यांची तपासणी करुन घशातील नमुने घेण्यात येत आहेत. महिलेची सुद्धा अशाच पद्धतीने चाचणी करण्यात आली होती.
“मजुरांची तपासणी करताना त्यांचा फोन नंबर आणि पत्ता लिहून घेतला जात आहे. या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यानंतर आम्ही लगेच तिला फोन केला. त्यावेळी तिने बसमध्ये असल्याचे सांगतिले. आम्ही ड्रायव्हरशी संपर्क साधला व त्याने लोकेशनची माहिती दिली. आम्ही लगेच दामोह प्रशासनाला याची माहिती दिली” असे भोपाळ प्रशासनाच्या प्रवक्त्याने सांगितले. दामोह प्रशासनाचे अधिकारी लगेच त्या बसपर्यंत पोहोचले व सर्वांना आता क्वारंटाइन करण्यात आले आहे.
