औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

औरंगाबादच्या करमाड येथे शुक्रवारी पहाटे मालवाहू रेल्वेखाली येऊन मृत्यमुखी पडलेल्या १६ मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. तसेच जखमींवर सरकारी खर्चाने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.  परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. या कामगारांनी धीर सोडू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

आज सकाळी या दुर्दैवी घटनेसंदर्भात कळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने मुख्य सचिव तसेच रेल्वे  प्रशासनाच्या वरिष्ठ  अधिकाऱ्यांशी चर्चा केली व घटनेविषयी जाणून घेतले. परराज्यातील हे मजूर जालना भागात एका स्टील कंपनीत कामाला होते आणि जालन्याहून रेल्वे मार्गाने चालत निघाले होते. रेल्वे मार्गावरच झोपल्याने पहाटे मालवाहू रेल्वे अंगावरून गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

गेल्या चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागातून विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहे. त्यातून सुमारे एक लाख लोक आपापल्या गावी सुखरूप पोहचले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत राज्यत अडकलेले सर्व श्रमिक व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या घरी पोहचतील असे नियोजन झाले असून रेल्वेशी सातत्याने समन्वय सुरु आहे. नुकतीच मुंबईहून रेल्वे सोडण्याचा निर्णयही झाला आहे. त्यामुळे जीवावर उदार होऊन स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका, असे आवाहन परत एकदा मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *