टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी मुंबईतील 18 वर्षांच्या मराठमोळ्या तरुणाच्या फार्मसीमध्ये गुंतवणूक केली आहे. रतन टाटा यांनी अर्जुन देशपांडे याच्या ‘जनरिक आधार’ कंपनीत 50 टक्क्यांची भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी औषधांच्या किरकोळ बाजारातील व्यापाऱ्यांना बाजारभावापेक्षा कमी दरात औषधांचा पुरवठा करते.
दरम्यान अर्जुन देशपांडेने या व्यवहाराच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परंतु रतन टाटा यांच्यासोबत किती रकमेत हा व्यवहार झाला याबाबत अधिक माहिती देण्यास त्याने नकार दिला. राहुल देशपांडेने दोन वर्षांपूर्वी आपल्या आई-वडिलांकडून भांडवल घेऊन हा व्यवसाय सुरु केला होता.
चार महिन्यांपासून बोलणी सुरु
अर्जुन देशपांडे याच्या माहितीनुसार, “उद्योजक रतन टाटा मागील तीन ते चार महिन्यांपासून माझ्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करत होते. टाटा यांना माझ्या व्यवसायात भागीदार बनायचं होतं. सर रतन टाटा यांनी दोन दिवसांपूर्वीच ‘जनरिक आधार’मध्ये 50 टक्क्यांची भागीदारी केली आहे. यासंदर्भातील औपचारिक घोषणा लवकरच केली जाईल.”
