खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात कारवाई सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील १३ कृषिसेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी ही कारवाई केली असून, आतापर्यंत १५४ परवाने निलंबित केले आहेत.
कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन सुरू केले आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशकांची गुणवत्तापूर्ण विक्री सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या सुनावणीदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून खरीप हंगामाचे नियोजन सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाच्या निविष्ठांची विक्री किंवा जादा दराने विक्री होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षक माने यांनी दिले आहेत.
५२ परवाने कायमस्वरूपी रद्द
खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कारवाई सुरू आहे. ९ एप्रिल २०२६ पासून आजअखेर खते १०८, बियाणे २६ व कीटकनाशके २० असे एकूण १५४ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. एकूण ५२ परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. राज्यात नाशिक हा सर्वाधिक परवान्यांवर कारवाई करणारा जिल्हा ठरला आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी सेवा केंद्रांकडूनच बियाणे व खते खरेदी करावीत आणि खरेदीवेळी पक्के बिल अवश्य घ्यावे. कोणत्याही कृषी सेवा केंद्राकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी. तक्रारींसाठी तालुकानिहाय कृषी अधिकारी, गुणनियंत्रण व कृषी अधिकाऱ्यांच्या संपर्क क्रमांकावर तसेच जिल्हास्तरीय ७६२७०३७४०८ या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
