अद्याप केडीएमसी रुग्णालयांच्या फायर ऑडीट मधील त्रुटी तशाच ; मुहूर्त काही सापडेना

अमरावती रुग्णालय दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयांचे अग्निशमन विभागाकडून फायर ऑडिट करण्यात आले. मात्र, या अहवालात नोंदवण्यात आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी अद्याप मुहूर्त सापडलेला नाही.

अद्याप कार्यवाही नाही

महापालिकेच्या वसंत व्हॅली प्रसूतिगृहात अत्यावश्यक सेवांसाठी स्वतंत्र जिन्याची व्यवस्था करण्याची गरज असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. याखेरीज रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयांतही काही आवश्यक बदल करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. मात्र, सहा महिने उलटले तरी अद्याप याबाबत कार्यवाही झालेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दररोज १५ ते २० महिला प्रसूतीसाठी दाखल

कल्याण-डोंबिवलीमहापालिकेची रुक्मिणीबाई, शास्त्रीनगर, गीता हरकिसनदास, वसंत व्हॅली आणि शक्तिधाम अशी पाच रुग्णालये आहेत. या रुग्णालयांत मोठ्या आजारांवर उपचार होत नसले तरी दररोज किमान १५ ते २० महिला प्रसूतीसाठी दाखल होतात. नवजात बाळे, बाळंतिणी तसेच त्यांचे नातेवाईक यांचा या रुग्णालयांत राबता असतो.

ऑडिट अहवाल बांधकाम विभागाकडे

अमरावतीत प्रसूतिगृहात घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच रुग्णालयांच्या फायर ऑडिटची चर्चा सुरू झाली आहे .दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सर्वच छोट्या-मोठ्या रुग्णालयांचे ऑडिट मार्च महिन्यात अग्निशमनविभागाकडून करण्यात आले आहे. या ऑडिटमध्ये काही महत्त्वाचे, तर काही किरकोळ बदल सुचवण्यात आले आहेत. हे बदल पालिकेच्या बांधकाम विभागाकडून केले जाणे अपेक्षित असल्याने ऑडिट अहवाल बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्याला चार महिने उलटून गेले आहेत.

संबंधित विभागांना सूचना

या रुग्णालयांतील विद्युत यंत्रणेतही काही बदल सुचवण्यात आले होते. हे बदल विद्युत विभागाकडून करण्यात आले असून, रुग्णालयांतील अंतर्गत वायरिंग दुरुस्तीचे कामही पूर्ण करण्यात आले आहे. याबाबत विचारणा केली असता उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी सांगितले की, ऑडिट अहवालातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. बांधकाम विभागाकडून लवकरात लवकर त्रुटींची पूर्तता केली जाणार असून, विभागाने रुग्णालयांची पाहणी केल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *