कार्यक्षम यश अकार्यक्षम विरोध

कार्यक्षम यश अकार्यक्षम विरोध

एखाद्याचे बारा वाजवणे. एखाद्याला बाराचा म्हणणे किंवा वाजले की बारा- जाऊदे की घरा लावणी असेल या `बारा’ ची संख्या खरच भारी आहे. देवांना प्रसन्न करण्यासाठी सुद्धा तप करायला लागायचे आणि हे तप बारा वर्षाचे असायचे. ही बारा वर्षे-बारा संख्या सर्व बाबतीत महत्त्वाची ठरते. घडयाळ्यात बारा वाजताच म्हणजे नेमके काय होते तर घडयाळाचे दोन्ही काटे हे एकत्र येतात थोडक्यात एकावर एक असे एकरूप होतात.
2014 ते 2026 ही बारा वर्षाच्या वाटचालीला काय म्हणायचे. ही बारा वर्षे पूर्ण झाली ती केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारची. त्याचबरोबर विरोधी पक्षाची सुद्धा आहे. या बारा वर्षात मोदी सरकारने जेवढी ध्येयपूर्तीसाठी कामकाज केले तेवढे प्रयत्न विरोधी पक्षाने आपली भूमिका पार पाडण्यासाठी केले का हा प्रश्न आहे? निवडणुकीत जिंकून सत्ता स्थापन करणे आणि बारा वर्षे अविरतपणे सत्तेत राहून ती तपपूर्ती आहे. जनतेसाठी तपश्चर्य आहे असे भासवण्यात सुद्धा मोदींना यश आले आहे. भाजपाच्या सत्ता काळाचे यश हे स्वयंसिद्ध म्हणावे की विरोधी पक्षाचा नाकर्तेपणा याचा आता विचार करायची गरज आलेली आहे. प्रत्यक्षात समाजकारण आणि राजकारण यांचा पुरेपूर वापर करून भाजपा आपले सत्ताकारण करीत आहे. भाजपाचे हे यश हे त्याचे उदाहरण आहे. जनतेचा विश्वास संपादन करणे हे सत्ताधीशांचे कर्तव्य आहे तसेच ते कर्तव्य विरोधी पक्षाने सुद्धा बजावणे गरजेचे आहे. विरोधाला विरोध करणे म्हणजे विरोधी पक्षाचे कर्तव्य नाही तर जनतेच्या दृष्टीने एखादी गोष्ट बरोबर होत नाही याबाबत किंवा चुकीचे होते याबाबतचा विचारण्याची पण आहे. मोदींनी सत्तेची बारा वर्ष पूर्ण केली तपपूर्ती केली ही गोष्ट साजरी केली. भाजपांच्या दृष्टीने हा उत्सव होता. हा उत्सव साजरा करण्याच्या एक दिवस अगोदर संध्याकाळी इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक सुद्धा विरोधी पक्षाची सडेतोड भूमिका ठरवणारी झाली नाही अर्थातच विरोधी पक्षाची अपयशाची गाथा पुन्हा पुढे सुरूच राहिली आहे.
भाजप सरकार मोदींचे नेतृत्व किती योग्य अयोग्य त्याचबरोबर देशातल्या जनतेच्या दृष्टीने किती उपयोगाची आहे याबाबत चर्चा आणि भूमिका स्पष्ट असणे गरजेचे आहे. लोकशाहीत विरोधी पक्षाचे कर्तव्य जनतेच्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व करणे आहे याचा विसर विरोधी पक्षाला पडला आहे. की विरोधी पक्षाचा प्रभाव नष्ट झाला आहे कारण सत्ताधारी भाजपाचा धोरण आणि योगदान बाबत योजना याबाबत कसा चुकीचा आहे हे विरोधी पक्ष स्पष्टच करीत नाही. इंडिया आघाडीच्या बैठकीला देशभरात असलेल्या 23 पक्षाने हजेरी लावली आता देशभरात असलेल्या वेगवेगळ्या विरोधी पक्षांना भाजपाला रोखण्यात यश आले नाहीत पण जनतेच्या प्रश्नांबाबतचा विचारण्याच्या कर्तव्याचा विसर पडलेला आहे. सत्ताधारी कार्यक्षम नाहीत हे सांगण्यासाठी विरोधी पक्षाने आपली अकार्यक्षमता दूर करायला पाहिजे.
बारा वर्षाची तपपूर्ती करताना भाजपाच्या वाटयाला अपयश आले नाही असे नाही. 2024 च्या निवडणुकीत ‘चारसो के पार’ असा दावा भाजपाने केला व भ्रामक समजूतींतून भाजपाने मुखभंग करून घेतला; पण हा मूकभंग भाजपाने धडा म्हणून घेतला. भाजपाचा भ्रामकदाव्यांचे अपयश पाहून नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष गाफील राहिले. भाजपाने मात्र विधानसभांमध्ये अनेक राज्यात यश मिळवले.
सर्वसामान्यांच्या दृष्टीने, जनतेच्या दृष्टीने राजकारणात काय घडते आहे याला महत्त्व नसते. त्यातल्या त्यात आयाराम गयाराम वृत्तीच्या या पक्षातून दुस-या पक्षात उडी मारणा-या कर्तृत्वाला करमणूक म्हणून पाहिले जाते. सर्वसामान्यांचे प्रश्न सरकार सोडवत नाहीत. जनतेला त्याचे प्रश्न ते न सोडवण्यामागची दहाकता दाखवण्याचे काम विरोधी पक्षाचे असते आणि तेथेच नेमके विरोधी पक्ष अपयशी होत आहेत. प्रखर विरोध विचारपूर्वक असला तर सत्ताधाऱयांना जबाबदारीने निर्णय घेऊन अंमलबजावणी करावीच लागते. विरोधी पक्षाचा शहाणपणा, जनतेशी असलेली बांधिलकी, सत्ताधिशांना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात भाग पाडते हा लोकशाहीतला महत्त्वपूर्ण टप्पा आहे. भाजपाचे यश तपपूर्ती नाही तर आपल्या बौद्धिक कल्पकतेमुळे आहे. भाजपाने बारा वर्षात घेतलेले निर्णय हे सर्व जनतेच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीने लाभदायक होते असा होत नाही. राजकीयदृष्टया भाजपा हा अपराजित म्हणून जरूर सिद्ध होत आहे, परंतु आर्थिक निर्णय, आंतरराष्ट्रीय आव्हाने यांना याबाबत भाजपा संभ्रमित आहे. रुपयांचे अवमूल्यन, बेरोजगारांची वाढत्या संख्येबाबत संवेदनशीलता नाही. न्यायव्यवस्थेपासून, शिक्षक व्यवस्थेपासून विविध परिस्थिती आहे याबाबत जाब विचारणारे जर समोर येत नसतील, विरोधी पक्षांकडून जनतेला पर्याय मार्ग सांगितला जात नसेल, सत्ताधारी पक्षांची मनमानी चालणारच अशी जर भूमिका मान्य करावी लागली तर लोकशाहीच्या दृष्टीने बाधक ठरेल.
लोकशाहीमार्गाने सत्ताकारण चालले पाहिजे. सत्ताधीशांचे निर्णय फक्त विरोध करण्यासाठी आहेत असे न समजता त्यासाठी योग्य पर्याय असेल तर पुढे आणायला पाहिजे. विरोधी पक्षाला अपयश सातत्याने येत आहे यासाठी निराश न होता कामाला लागले पाहिजे आणि हे सर्व निवडणुकीच्या वेळेस नाहीतर पूर्णवेळसाठी करावे लागेल. सत्ताटिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी भाजपाचे कौतुक करायलाच हवे. तपपूर्तीचे पंतप्रधान यशस्वी होण्याचे कौतुक निश्चितच करायला हवे पण विरोधी पक्षांना जनतेचे प्रश्न मांडता येत नाही ही अपरिहार्यता नसावी. कार्यक्षम सत्ताधीशांचे यश हे अकार्यक्षम विरोधी पक्षामुळे आहे असे म्हणावे लागू नये.
डॉ.विलास पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *