दहशतवादात चांगला किंवा वाईट असा फरक करता येत नाही. दहशतवाद हा वाईटच आहे. त्याचा बीमोड झालाच पाहिजे. दहशतवादात सहभागी असणार्यांना शिक्षा व्हायलाच हवी. ‘समजनेवाले समज जायेंगे, अकलमंद को इशारा काफी है’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. संयुक्त अरब अमिरातच्या दुसर्या दिवशीच्या दौर्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजे मोहम्मद बिन जायेद अल नह्यान यांच्यात दहशतवादाविरुद्ध लढण्यासह व्यापार आणि उद्योगवाढीसंदर्भात ३१ करार झाले. रात्री दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर ५० हजार हिंदुस्थानी नागरिकांना पंतप्रधान मोदी यांनी मार्गदर्शन केले. तब्बल ७० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी नाव न घेता पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. सर्व शेजारील राष्ट्रांबरोबर हिंदुस्थानला सलोख्याचे संबंध ठेवायचे आहेत. चर्चेने सर्व प्रश्न सुटू शकतात यावर हिंदुस्थानचा विश्वास आहे. मात्र यासाठी शेजारच्या देशाने दहशतवादाचा मार्ग सोडायला हवा. जगानेही आता कोणाबरोबर राहायचे हे ठरवावे. दहशतवाद पोसणार्यांबरोबर की दहशतवादाविरुद्ध लढणार्यांबरोबर याचा निर्णय घ्यावा. दहशतवाद हा वाईटच आहे. गुड तालिबान, बॅड तालिबान, गुड टेरर, बॅड टेरर असे काहीही नाही. टेरर हे बॅडच आहे. मानवतेवर विश्वास ठेवणार्यांनी एकत्रपणे दहशतवादाचा मुकाबला करायला पाहिजे. दहशतवादात सहभागी असणार्यांना शिक्षा झालीच पाहिजे. समजेनवाले समज जायेंगे, अकलमंद को इशारा काफी है, असे पंतप्रधानांनी सुनावले. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेलाही कोणत्या देशाला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करावे, याचा निर्णय घेता आलेला नाही. त्यांना दहशतवादाची व्याख्याच करता येत नाही, असे त्यांनी खडसावले. चर्चेने प्रश्न सुटू शकतात. हिंसेचा मार्ग सोडा चर्चेला या, असे सांगून पंतप्रधानांनी बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, मालदीवबरोबर असलेल्या सलोख्याच्या संबंधांची माहिती दिली. दाऊदचा ‘धंदा’ बंद होणार? मोस्ट वॉण्टेड कुख्यात दाऊद इब्राहिम पाकिस्तानात राहत असला तरी त्याला पैशाची रसद दुबई आणि अरब देशांमधून मिळते. दुबई, अबुधाबीसह अनेक ठिकाणी दाऊदने रियल इस्टेट, हॉटेल्स यामध्ये अब्जावधी रुपये गुंतविले आहेत. ड्रगची तस्करीही सुरू आहे. दाऊदचे हे काळे धंदे बंद झाले तर त्याला मोठा झटका बसेल. दाऊदला धडा शिकविण्यासाठी त्याचे हे धंदे बंद करण्यासंदर्भात पंतप्रधान मोदी आणि राजे शेख मोहम्मद बिन जायेद अल नह्यान यांच्यात चर्चा झाली का, असा प्रश्न पत्रकारांनी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांना विचारला असता त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. मसदर शहराची शानदार सफर यूएई दौर्याच्या दुसर्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त अमिरातमधील नामांकित मसदर शहराची सफर केली. झिरो कार्बन उत्सर्जन स्मार्टसिटी असलेले मसदर अक्षय ऊर्जेवरील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्ण शोधाचे हब म्हणून ओळखले जाते. अबुधाबीपासून १७ कि.मी. अंतरावर असलेल्या मसदरमध्ये पंतप्रधान मोदी यांनी तासभर फेरफटका मारला. इथे असलेल्या डिजिटल व्हिजिटर बुकमध्ये ‘सायन्स इज लाइन’ असा मजकूर लिहीत नोंद केली. वैज्ञानिक कल्पनांच्या आधारावर बांधलेल्या वेगवेगळ्या गोष्टींची त्यांनी माहिती घेतली. स्वयंचलित असलेल्या कारमधून पंतप्रधानांनी मसदरची सफर केली.
पंतप्रधान मोदी यांचा पाकिस्तानला इशारा

