नोटाबंदीनंतर रोख व्यवहारांची संख्या वाढल्याने कोमात गेलेल्या ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला करोना व्हायरसमुळे संजीवनी मिळाली आहे. रिझर्व्ह बँकेने करोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांना रोख व्यवहारांऐवजी डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन केले असून त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत.
रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालयाने डिजिटल पेमेंटचा वापर वाढवण्याचे आवाहन केले आहे. चलनी नोटांमधून व्हायरसचा प्रसार होऊ शकतो, यामुळे रोख व्यवहार टाळा, असे ‘RBI’ने म्हटलं आहे. आर्थिक व्यवहार करण्यासाठी नागरिकांनी UPI , NEFT, मोबाइल बँकिंग, डेबिट आणि क्रेडीट कार्ड या पर्यायांचा वापर करावा, असे आवाहन ‘RBI’ने केलं आहे. अर्थ मंत्रालयाने देखील बुधवारी यासंबंधी अध्यादेश जारी केला आहे.
डिजिटल पेमेंटचे आरोग्यासाठीचे फायदे सांगणारे मेसेज बँकांकडून ग्राहकांना पाठवले जात आहे. तसेच ई-मेलमधून बँका जनजागृती करत आहेत. बँकांचे प्रतिनिधी, एटीएम येथेही डिजिटल बँकिंगचे फायदे दर्शवणारे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांत डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढले आहेत. करोनामुळे रोख व्यवहारांना आळा बसणार असून त्याऐवजी डिजिटल व्यवहारांची उलाढाल वाढेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
